आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक जण विविध उपक्रम राबवतात. मात्र, वडिलांच्या तेराव्याच्या उत्तरकार्यात पारंपरिक मिष्ठान्न भोजनावळीऐवजी गरजू आणि उपेक्षितांना अन्नदान करून ठाण्यातील योगेश कोळी व त्यांच्या दोन भावांनी वडिलांच्या संस्कारांना अनोखी आदरांजली वाहिली.
दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष, ऑनलाइन यूट्यूब चॅनेलचे यूट्यूबर, लेखक तसेच दिवंगत अनंत तरे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी आणि त्यांचे बंधू निलेश व संदेश कोळी यांनी त्यांचे वडील बाळाराम वामन कोळी यांच्या तेराव्याच्या दिवशी ठाणे सिव्हिल रुग्णालय परिसरात सुमारे २०० गरजू नागरिकांना अन्नदान केले. यामध्ये गरीब, रस्त्यावर कष्ट करणारे कामगार, कष्टकरी तसेच अनाथ मुलांचा समावेश होता. 1
वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलेल्या या अन्नदानातून कोळी कुटुंबीयांनी समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपली. वडिलांनी दिलेल्या संस्कारांची आठवण सांगताना योगेश कोळी म्हणाले, “पोट भरलेल्या माणसाला जेवू घालण्यापेक्षा उपाशी माणसाच्या पोटात एक घास जाऊ दे,” हा वडिलांचा विचार कायम स्मरणात राहिला आहे. त्यामुळे तेराव्याच्या उत्तरकार्यासाठी पारंपरिक पद्धतीने भोजनावळ करण्याऐवजी गरजूंच्या पोटात अन्नाचा घास जावा, या उद्देशाने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला.
“तेराव्याला ब्राह्मणांना भोजन घालण्याची परंपरा आहे. मात्र, गरजू, कष्टकरी, रस्त्यावरील मजूर आणि अनाथ मुलांना अन्नदान केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि मिळणारा आशीर्वाद हाच आमच्यासाठी वडिलांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या स्मृती जपण्याचा यापेक्षा सुंदर मार्ग दुसरा कोणता असू शकतो,” अशी भावना योगेश कोळी यांनी व्यक्त केली.
वडिलांच्या शिकवणीला सामाजिक उपक्रमाची जोड देत कोळी बंधूंनी केलेल्या या अन्नदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
वडिलांच्या तेराव्याच्या जेवणाऐवजी योगेश कोळी व दोन भावांकडून २०० गरजूंना अन्नदान



