परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; एकास अटक

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे मार्गावर परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा बाराचाकी ट्रक पकडला. या कारवाईत एक हजार बॉक्समधील ४८ हजार मद्याच्या बाटल्या आणि ट्रक असा एकूण एक कोटी ३० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
बेलापूर-ठाणे मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर सापळा रचला. यावेळी चॉकलेटी व पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा बाराचाकी ट्रक क्रमांक एमएच-१०-एडब्ल्यू-५२९४
अडविण्यात आला.
वाहनचालकाने ट्रकमध्ये साबणाचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, पथकाने वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात खाकी रंगाचे बॉक्स आढळले. बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित, महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांवर बॅच क्रमांक व कमाल किरकोळ किंमत नमूद नसल्याचेही निदर्शनास आले. एकूण एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी जावेदखान नवाबखान पिंजारी (वय २४) रा. गधडदेव, पो. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Scroll to Top