बदलापुरात ‘गणपती बाप्पाचा गजर’ भक्तिगीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

बदलापुरात 'गणपती बाप्पाचा गजर' भक्तिगीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

कुळगाव-बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘बदलापूर गणपती बाप्पाचा गजर’ या ऑनलाइन भक्तिगीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, ११ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. बदलापूर बदलापूर पूर्व येथील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
गणेशभक्ती आणि संगीत यांचा सुरेल संगम घडविणाऱ्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन माध्यमातून आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे गायनाची आवड असलेल्या नागरिकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासोबतच स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या स्पर्धेतून साध्य झाला.
स्पर्धेच्या निकालात पूजा पारसे यांनी प्रथम, दीपक रायपुरे यांनी द्वितीय, तर पल्लवी चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या हस्ते या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय श्रीमती महालक्ष्मी आणि श्री अरविंद पिंपूटकर दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नऊ बालस्पर्धकांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून आयोजित या स्पर्धेने भक्तिसंगीताची आवड जोपासण्याबरोबरच नागरिकांना आपली गायनकला सादर करण्याची संधी दिली. विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात या बक्षीस वितरण सोहळ्याची सांगता झाली.

Scroll to Top