मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत भिवंडीचा झेंडा

screenshot 4

अद्वैत जाधव ‘सामनावीर’

भिवंडी – मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित १२ वर्षांखालील ‘टॅलेंट हंट’ लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत भिवंडी तालुक्यातील समता नगर, पडघा येथील अद्वैत अमोल जाधव याने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला. कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर ही स्पर्धा पार पडली. अद्वैत जाधवने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी अष्टपैलू कामगिरी करत तीन सामन्यांत एकूण ९ फलंदाज बाद केले आणि १२० धावा जमविल्या. विशेषतः अंतिम सामन्यात त्याने ३ विकेट्स घेत ६७ धावांची सामना-विजयी खेळी साकारत आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याच्या या भक्कम प्रदर्शनामुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्याला मेडल तसेच वानखेडे स्टेडियम येथे होणाऱ्या आयपीएल सामन्याचे तिकीट देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी मुंबई शहर व ग्रामीण भागातून तब्बल ५००० खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली होती. पहिल्या फेरीत २३०, तर दुसऱ्या फेरीत १२० खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यातून ८ संघांची निर्मिती करण्यात आली होती. या स्पर्धेत अद्वैतची ‘ई’ संघात निवड झाली होती. लीग सामन्यांमध्येही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. ग्रामीण भागातून आलेल्या अद्वैत जाधवने आपल्या खेळाच्या जोरावर शहरी स्पर्धेत ठसा उमटवत भिवंडी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या या यशामागे भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न प्रशिक्षक हुसेन सरगुरू, उमरहुसेन सरगुरू, अजय जयस्वाल आणि कृष्णा केशरवाणी यांचे मार्गदर्शन लाभले. अद्वैतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल टी. ए. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पडघा, लोकधारा प्रतिष्ठान, समाज विकास मंडळ समतानगर तसेच संयुक्त जयंती महोत्सव कमिटी, पडघा विभाग यांच्यासह विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top