ठाणे – सालुदार हेल्थ केअर संघाने उप उपांत्य फेरीत एफटीएल एकादश संघाचा सहा फलंदाज राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्थेने युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आयोजित १४ व्या उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अथर्व काळेच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे सालुदार हेल्थ केअर संघाने एफटीएल एकादश संघाचे १२८ धावांचे आव्हान १५.४ षटकात चार गडी गमावून १२९ धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करताना जितेश राऊत आणि अनिल रोनांकीने छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. जितेशने ३६ आणि अनिलने ३७ धावांचे योगदान दिले. अमित यादवने १३ धावा केल्या. रॉयस्टन डायस आणि हरिकेश यादवने प्रत्येकी तीन गडी बाद करत फलंदाजांवर अंकुश ठेवला.
उत्तरादाखल आघाडीच्या फळीतील दोन फलंदाज झटपट बाद झाल्यावर सलामीच्या अथर्व काळेने मधल्या फळीतल्या फलंदाजाना हाताशी घेऊन विजय निश्चित केला. अथर्वने दहा चौकारांनीशी नाबाद ६२ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने अथर्वला तोलामोलाची साथ देत आनंद बैसने ३१ धावा बनवल्या. या डावात प्रेम देवकरने दोन बळी मिळवले.अथर्व काळेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : एफटीएल एकादश : १६.२ षटकात सर्वबाद १२८ ( जितेश राऊत ३६, अनिल रोनांकी ३७, रॉयस्टन डायस ४-३२-३, हरिकेश यादव ४-२२-३, सागर जाधव २.२-२५-२) पराभूत विरुद्ध सालुदार हेल्थ केअर : १५.४ षटकात ४ बाद १२९( अथर्व काळे नाबाद ६२, आनंद बैस ३१, प्रेम देवकर ४-२०-२, नविन शर्मा १.४-२३-१, अजय मिश्रा ४-१९-१).
सालुदार उपांत्य फेरीत



