एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची व शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात येते. या अनुषंगाने नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने एनएमएमटी घणसोली आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आलेली आहे.

या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झंझाड, माजी खासदार, डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य राजेश राय, यशपाल ओव्होळ, अभिजीत पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर तसेच परिवहन उपकमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक अचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सिताप आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी एनएमएमटी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. परिवहन उपक्रमात अहोरात्र कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महापौर महोदयांनी प्रशंसा केली. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल व कामाच्याच ठिकाणी व्यायामशाळा असल्याने आपल्या व्यस्त कामकाजातून नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल असे त्या म्हणाल्या. कर्मचारीवर्गाच्या आरोग्याकरिता परिवहन उपक्रमाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असल्याचे मत महापौर  सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top