गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केट येथे गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत. पहाटे तीन वाजता लागलेली आग दुपारी साडेबारा वाजता विजवण्यात आली. या आगीमध्ये मार्केटमध्ये असलेली १५५ दुकाने जळून खाक झाली आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, नौपाडा पोलीस, महावितरण कर्मचारी तसेच विविध यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी ५ फायर इंजिन, ३ जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकर, ४ रेस्क्यू वाहने, रुग्णवाहिका तसेच खासगी पाण्याचे टँकर यांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सुजित पष्टे (वय ४५) आणि तांडेल समीर जाधव (वय ४०) यांचा समावेश होता. दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या आगीत ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५३) आणि अग्निशमन केंद्रातील स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नाकती, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त दिनेश तायडे, दीपक झिंजाड उपआयुक्त मिताली संचेती, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top