भारत सरकारच्या जनगणना 2027 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. यंदाची जनगणना प्रथमतःच डिजिटल पद्धतीने होत असून, जनगणना प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त मास्टर ट्रेनर यांचेमार्फत एकूण 45 फील्ड ट्रेनर्सना 6 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये डिजिटल अॅपचा वापर, माहिती संकलनाची पद्धत तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचे कौशल्य अशा विविध बाबींचा समावेश होता. अशा प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्समार्फत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणा-या ८ चार्ज जनगणना कार्यालयांमार्फत ३,७९७प्रगणक (Enumerators) व पर्यवेक्षक (Supervisors) यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
आठ चार्ज जनगणना कार्यालयांतर्गत प्रगणक व पर्यवेक्षक यांनी दि. 16 मे 2026 पासून सर्व क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जनगणनेच्या कामास सुरूवात केली आहे. प्रत्येक प्रगणकास नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चार्ज जनगणना अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र आणि आदेश देण्यात आले आहेत. विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे जनगणना कार्यात सहभाग घेऊन, आपली सत्य व संपूर्ण माहिती प्रगणकांना देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. प्रगणक जेव्हा घरी भेट देतील तेव्हा त्यांचे ओळखपत्र तपासून आपण स्वगणना केली असल्यास आपला SE ID त्यांना द्यावा अथवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ती ते नोंदवून घेतील आणि आपल्या घराची घरगणना प्रकिया पूर्ण होईल. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची अथवा आधारकार्ड, पॅनकार्ड बाबतची माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व अशा प्रकारची माहिती मागणा-या तोतयांपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणा-या तथा प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणा-यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही सूचित करण्यात येत आहे.


