आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाला दिला इशारा
ठाणे – ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचे पेव फुटले असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झाले आहेत तर आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १०८ व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली.
ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात ही बांधकामे सुरू आहेत. यामुळे उपलब्ध सोयी सुविधांवर ताण पडून सर्वसामान्य नागरीक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत असते. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यवधींच्या हप्त्याची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारींनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने शहरात माफिया मुजोर झाले आहेत. तर आयुक्त या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून राज्य शासनाला यात हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. कळव्यातील वाघोबानगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने कारवाई केली, मात्र ही कारवाई पूर्ण करावी, अशी मागणी करत वेळीच कारवाया केल्यास भविष्यात संघर्ष निर्माण होत नाही, असे मतही श्री. केळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक विकास पाटील, अमित सरैय्या, सुरेश कांबळे, माजी महापौर मनोहर गाढवे, स्वप्नाली साळवी, रक्षा यादव आदी उपस्थित होते.


