वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
भिवंडी-कल्याण मार्गावरील बायपास हद्दीत ठाणे महानगर पीएनजी गॅसची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. भिवंडी कल्याण बायपास रस्त्यावर ठाणे महानगर पीएनजी गॅसची पाईपलाईन अचानक फुटली. या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. कुठलीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने अग्निशमन दल आणि संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली.
भिवंडी महापालिका अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, घटनेचा कॉल मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन जवानांनी तात्काळ मोर्चा सांभाळला. गॅस कंपनीच्या चालकांनी आणि अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भिवंडी परिसरातील वाहनांना होणारा पीएनजी गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला आहे. सध्या गॅस गळती थांबवण्यात आली असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या वेळेच्या सुयोग्य नियोजनामुळे आणि सतर्कतेमुळे परिसरात मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.


