मुरबाड मध्ये संगीत विद्यालय उभारणार -आमदार किसन कथोरे

 ठाणे जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धा २०२६”

मुरबाड- माऊली गार्डन हॉल, म्हसा रोड, मुरबाड येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भजन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसर विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषाने दुमदुमून गेला.

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतील नामवंत भजन मंडळे, कीर्तनकार आणि वादकांनी सहभाग घेतला. भजन, अभंग आणि हरिनामाच्या सादरीकरणातून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली. या कार्यक्रमांमध्ये सर्व मान्यवरांना सर्वांना मार्गदर्शन करताना आमदार किसन यांनी सांगितले की, तालुक्यातील तरुण पिढीने क्रिकेटकडे व इतर गोष्टीकडे लक्ष न देता गायन, कीर्तन, शिक्षण या गोष्टीकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारचे गायक, भजन सम्राट बनले पाहिजे. त्यासाठी भविष्यात चांगल्या प्रकारे संगीत विद्यालय निर्माण करण्याचा मानस आहे. या गोष्टीकडे आपल्या तालुक्यातील  महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेले महेश कंटे यांनी संपूर्ण लक्ष देऊन हे काम हाती घ्यावे यासाठीचे सहकार्य लागेल ते पुरवण्यासाठी मी तयार आहे, असे आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि चषक प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक देण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट गायक, तबलावादक, पखवाजवादक आणि चकवा वादक यांना प्रत्येकी १ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

या भक्तिमय सोहळ्यास माजी आमदार गोटीरामभाऊ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश बांगर, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, युवा नेते दीपक कथोरे आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, नरेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्पर्धेचे परीक्षण पंडित बाळासाहेब वाईकर (संगीत अलंकार, अहिल्यानगर) आणि कौस्तुभ तळेकर (तबला अलंकार) यांनी केले. तसेच प.पू. योगी फुलनाथजी महाराज, योगी यशवंत महाराज, ह.भ.प. सरजिने बाबा, प.पू. गोपीनाथ महाराज आणि प.पू. कमलनाथ महाराज यांचे आशीर्वाद कार्यक्रमाला लाभले.      

विष्णु स्मृती सेवा संघ भजनी मंडळ डोंबिवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आई जननी कुंभलंजा भजन मंडळ हेदुटाने व श्रीराम प्रसादिक भजन मंडळ वसार यांनी द्वितीय नंबर पटकावला. तर श्री गांगेश्वर आकारी ब्राह्मण देव  प्रासादिक भजन मंडळ (डोबिवली) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

खोमजाई प्रासादिक भजन मंडळ दिवा व कुलस्वामिनी भजन मंडळ असोसे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. काम लिंगेश्वर भजन मंडळ म्हसा यांनी उत्कृष्ट गायक व उत्कृष्ट तबलावादक म्हणून पारितोषिक मिळविले. भावई प्राथमिक भजन मंडळ दिवा यांना यांना उत्कृष्ट चकवावादक पारितोषिक मिळाले.

या भव्य स्पर्धेचे आयोजन संतोष गजानन चौधरी अध्यक्ष माऊली सामाजिक संस्था, सचिव भाजपा ठाणे ग्रामीण आणि ह.भ.प. डॉ. संजय घुडे यांनी केले. गायक महेश कंटे आवाज महाराष्ट्राचा सारेगमफेम, गणेश केमारे, धनाजी महाराज गायकर व एकादशी मंडळ मधील सर्व सदस्य, कैलास मनोरे यांनी यूट्यूब चैनल वर थेट प्रक्षेपण दाखविले. जय मनोरे, शरद टोहके यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी ईशान घरत यांनी यशस्वीपणे सांभाळली. तुषार कडवाडकर, सुरेश ना. बांगर मोहन गडगे (नगराध्यक्ष मुरबाड) यांचे विशेष व अन्य मान्यवरांचे सहकार्य लाभले.

Scroll to Top