जिल्हा परिषद शाळा दापोडे येथे प्रवेशोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ठाणे – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद शाळा दापोडे भिवंडी येथे पहिल्या दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांना स्वागत केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी गोड खाऊचेही वाटप करण्यात आले.

‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची संस्मरणीय नोंद करण्यात आली. तसेच ‘मिशन भरारी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इस्रोच्या शैक्षणिक सफरीचा अनुभव देण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन, उपग्रह निर्मिती, रॉकेट प्रक्षेपण यांसारख्या विषयांची माहिती घेतली तसेच शास्त्रज्ञांशी संवाद साधून विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयीची उत्सुकता वाढवली, याबाबत कौतुक करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले असून, याच शाळेने मला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने शिक्षण घेत आपले भविष्य घडवावे.’

त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. उपस्थित अधिकारी व मान्यवरांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील, माजी नगरसेवक भरत पाटील, सरपंच संध्या पाटील, गटशिक्षणाधिकारी वैशाली डोंगरे, विस्तार अधिकारी आशिष झुंजारराव, जिल्हा समन्वयक (समावेशित शिक्षण) अनिल कुऱ्हाडे, मुख्याध्यापक अशोक पाटील तसेच शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबरोबरच पालकांचा शाळेवरील विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात झाली असून जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.



Scroll to Top