पावसाळी कालावधीतील मदतकार्यासाठी नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज

नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळी मदतकार्यासाठी सज्ज असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पावसाळी स्थितीचा व नवी मुंबईतील परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्ष असून त्याठिकाणी अहोरात्र 24X7 मनुष्यबळ व यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 24X7 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचही आग्निशमन केंद्रांमध्ये तत्पर मदत कार्यासाठी कृतीदल सज्ज आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भाग हा समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर असून अशा अतिसखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचते हे लक्षात घेऊन त्याठिकाणी पाणी उपसा पंप कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील मदतकार्य पथक आपापल्या क्षेत्रात फिरुन रस्त्याच्या कडेला गटारात पाणी वाहून जाणा-या वॉटर एन्ट्रीमध्ये काही अडथळे येऊन पाणी साचल्याचे निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी जाऊन वॉटर एन्ट्री खुल्या करुन पाण्याचा निचरा करून देण्यासाठी वाट करुन देत आहेत. त्याचप्रमाणे वा-यामुळे कुठे झाडांच्या फांद्या पडून वाहतूकीला व रहदारीला अडथळा येत असल्यास त्या ठिकाणी पोहचून फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली जात आहे.

पावसाळी कालावधीत नागरिकांना महानगरपालिकेशी संपर्क साधण्याकरिता नियंत्रण कक्षांचे संपर्कध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी आपल्या नजीकच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी अथवा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Scroll to Top