नगरसेविका जयश्री डेविड तक्रारीनंतर कारवाई
टीएमटी’च्या पवारनगर येथील बस स्टॅण्डलगत चहाविक्रेता व पान टपरीवर पहाटेपर्यंत होणाऱ्या तरुणांच्या गर्दीमुळे रहिवाशी हैराण झाल्याकडे शिवसेना नगरसेविका जयश्री डेविड यांनी महासभेचे लक्ष वेधल्यानंतर, २४ तासांतच महापालिकेने बुलडोजर चालवून बेकायदा टपरी पाडली. महासभेतील तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी कारवाई झाल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या कारवाईबद्दल नगरसेविका जयश्री डेविड यांनी आभार मानले आहेत.
पवारनगर येथील स्टॅण्डवरील अधिकृत झुणका-भाकर केंद्राच्या चालकाने महाराज चायवाला म्हणून फास्ट फूड सेंटरमध्ये रुपांतर केले. तर या सेंटरशेजारी बेकायदा पान टपरी उभारण्यात आली होती. या ठिकाणी संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत चार चाकी मोटारी घेऊन तरुणाईची गर्दी होत होती. त्यामुळे काही गैरप्रकार सुरू असल्याची शंका आहे, याकडे नगरसेविका जयश्री जेरी डेविड यांनी लक्ष वेधले होते. या तक्रारीची आयुक्त सौरभ राव यांनी दखल घेतली. त्यानंतर आज दुपारी टपरीविरोधात कारवाई करण्यात आली.


