भिवंडीत फुटला ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर तिघांच्या मुसक्या आवळल्या

पेपर फुटीचे दिल्ली कनेक्शन, दीड कोटीला विक्री करणारा होते पेपर

२३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच डीएड उत्तीर्ण प्राथमिक शिक्षक यांच्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षेचा पेपर भिवंडीतून फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. धीरज बलराज सिंग वय २८ हरियाणा, राजीव शाव वय ४५ व आकाश कुमार सरोज कुमार वय ३० दोघे रा. बिहार असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांना २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी भिवंडीत काही जण येणार असल्याची गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पोलीस पथकाने कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई नाशिक महामार्गावरील ओवळी डोंगराळी गाव परिसरात सापळा रचला. तेव्हा हे तीन आरोपी रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून उभे असलेले दिसले. त्यांच्याकडे तपास केला असता हे टीईटी पेपर प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असता तिघांनाही अटक केली असून त्यांच्या झडतीत त्यांच्याकडे रविवारी (२८) रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचे चार प्रश्नपत्रिका संच आढळून आले आहेत.

पोलिसांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अधिकारी यांना बोलावून या प्रश्नपत्रिका पेपर संदर्भात तपासणी केली असता हे प्रश्नसंच २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचेच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. हे तिघेही आरोपी टीईटी परीक्षेचा पेपर दिल्ली येथून घेऊन भिवंडी या ठिकाणी दीड कोटी रुपयांना हा पेपर विक्रीसाठी घेऊन आले होते अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे. या तिघा आरोपींपैकी धीरज बलराज सिंग हा सायन्स पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून, इतर दोघे ही उच्च शिक्षित असून तिघे ही आर्थिक सधन घरातील आहेत. या तिघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस तपास पथक तयार करण्यात आले असून यामध्ये दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, नऊ पोलिस निरीक्षक व २० कर्मचारी असणार आहेत.
या टोळीचा सूत्रधार फरार असून त्यांनी पेपर नक्की कोठून बाहेर काढला, अजून किती ठिकाणी पेपर विक्री केला आहे का, त्यामध्ये काही शिक्षक व इतर कोण सहभागी आहेत का याचा तपास या पथकाकडून सुरू करण्यात आला असून त्यासाठी विविध पथक राज्यात ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.

Scroll to Top