सध्या अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भेसळ करणारे व मुदतबाह्य साहित्य विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. त्यानुसार भिवंडी शहरातील निजामपूर परिसरात अन्न निरीक्षण पथकाने केलेल्या कारवाईत ५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुदतबाह्य पिठाचा नऊ टन वजनाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध पथकातील सहाय्यक आयुक्त संतोष सरोसिया व अन्न सुरक्षा अधिकारी यांना भिवंडीत एका ट्रक मधून मुदतबाह्य पिठाचा साठा गुजरात भुज येथील व्यापारी विनोद भानुशाली यांना विक्रीसाठी पाठवला जाणार आहे अशी खबर मिळाल्या वरून या पथकासह निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे व त्यांच्या पथकातील पोलिसांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित ट्रक क्रमांक जी जे ३९ टी ए ६८२७आला असता त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रक मध्ये विविध कंपनीच्या नावाचा नऊ टन वजनाचा मुदतबाह्य झालेला व पॅकेज फुटलेला पिठाचा साठा पुन्हा बाजारात विक्री करीता आणण्यासाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक फारूक जुसब खलीफा वय २६, रा. भुज गुजराथ व या व्यवहारातील दलाल फरहान मुकीम अन्सारी वय ३१ रा. दिवानशहा दर्गा अशा दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


