कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजप गटनेते व नगरसेवक शशिकांत कांबळे तसेच महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी गुरुवारी फ प्रभागातील त्रिमूर्ती नगर, डोंबिवली पूर्व येथे एक विशेष जनजागृती मोहीम आयोजित केली. या मोहिमेमध्ये नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा संकलन, तसेच रस्त्यांवर कचरा टाकण्याच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कचऱ्याचे वर्गीकरण हे केवळ नियमाचे पालन नाही, तर ते शहराच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेले एक महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे. प्रत्येक घरातून कचरा, स्रोतावरच ओला व सुका असा वेगळा करून द्यावा, तरच शहर स्वच्छ व सुंदर राहील, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. या मोहिमेदरम्यान नागरिकांना कचरा संकलन वाहन येण्यापूर्वी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता, केवळ वाहन आल्यावरच थेट त्यात द्यावा, असेही आवाहन करण्यात आले. रस्त्यांवर कचरा टाकल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो, तसेच शहराची प्रतिमा मलिन होते, असे नागरिकांना समजावून सांगण्यात आले.
या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा आणि उल्लेखनीय पैलू म्हणजे भाजप गटनेते व नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी घेतलेला पुढाकार.


