कल्याण पूर्वेतील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा विधानसभेत

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२६ मधील ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ माध्यमातून आमदार सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथील महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही दिवसांत घडलेल्या दोन अमानुष घटनांनी संपूर्ण कल्याण पूर्वची मान शरमेने खाली गेली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर केवळ ७ वर्षीय निष्पाप चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार या घटना केवळ गुन्हे नसून समाजाच्या विवेकाला हादरा देणाऱ्या आहेत. अशा नराधमांना समाजात मोकळे फिरण्याचा कोणताही अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा गायकवाड यांनी शासनाकडे अत्यंत ठामपणे काही मागण्या केल्या आहेत.

यामध्ये दोन्ही पीडित मुलींना तातडीने सर्वतोपरी आर्थिक, वैद्यकीय व मानसिक मदत उपलब्ध करून द्यावी. आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल. कल्याण पूर्वातील चक्की नाका, १०० फुटी रोड आणि मलंग रोड परिसरात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करून कार्यान्वित करावी तसेच या परिसरात पोलीस गस्त आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली.

Scroll to Top