भिवंडी: भिवंडी-नाशिक महामार्गावरील मुख्य पडघा टोल नाक्यावर भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याच ठिकाणी खड्डाही पडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
टोल नाक्यावरून दररोज हजारो दुचाकीस्वार प्रवास करत असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पडघा टोल नाक्यावरून दररोज अनेक नागरिक कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, तसेच पालक आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी दुचाकीचा वापर करतात. याशिवाय पडघा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकही याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र दुचाकी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे वाहन घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. धोकादायक परिस्थितीमुळे अनेक दुचाकीस्वार दुचाकी मार्ग टाळून चारचाकी वाहनांच्या लेनमधून प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी व मोठ्या वाहनांमध्ये अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. प्रवाशांकडून नियमित टोल वसूल केला जात असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात टोल प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. टोल नाक्यावरच अशा प्रकारची धोकादायक परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब असून, भविष्यात एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुचाकी मार्गात पाणी नेमके कोणत्या कारणामुळे साचत आहे, तसेच त्यावर तातडीने उपाययोजना का करण्यात येत नाही, याबाबत पडघा टोल प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या तातडीने सोडवून दुचाकी मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.


