मागील तीन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील काही भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले असून याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला हे लक्षात घेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढील पावसाळा कालावधीत अधिक गांभीर्यपूर्वक सतर्कतेने काम करावे असे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी पावसाळी परिस्थितीच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी दिले.
१ जुलै रोजी भर पावसात बेलापूरपासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रातील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर महापौर महोदयांनी विशेष बैठक बोलावत यापुढील कालावधीत प्रत्येक पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आपली यंत्रणा नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता सतर्क राहिली पाहिजे असे निर्देशित केले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक रविंद्र इथापे व शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही अतिसखल भागात पाणी साचते. मात्र या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा अधिक सक्षमतेने नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असली पाहीजे असेही निर्देश संबंधित विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
विशेषत्वाने पाणी साचल्याचे आढळले अशा ठिकाणी रस्त्यावरून पाणी गटारात वाहून नेणाऱ्या वॉटर एन्ट्रीज युध्द पातळीवर तातडीने खुल्या कराव्यात व त्यासोबतच पाऊस नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे व त्यादृष्टीने मदत कार्यासाठी तत्पर राहणे ही आपली जबाबदारी असून संबंधित अधिकाऱ्यांवर आपापल्या कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे असे महापौर महोदयांनी स्पष्ट केले.
सर्व कोचींग क्लासेस व ट्युशन्सच्या जागांची स्ट्रक्चरलदृष्ट्या पाहणी करावी तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीनेही पाहणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याप्रसंगी दिले.


