भिवंडी तालुक्यातील बी. बी. पाटील विद्यालय, कुंरुंद येथे ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सुमारे १५० विविध प्रजातींच्या रोपांची शाळेच्या परिसरात लागवड केली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्याबरोबरच मातृप्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या फळझाडे, फुलझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘आईने आपल्याला जन्म दिला, संस्कार केले आणि आयुष्य घडवले. तिच्याप्रती खरी कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर तिच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे जतन व संवर्धन करणे हीच सर्वात मोठी आदरांजली आहे!’ त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाची नियमित काळजी घेऊन ते मोठे करण्याचे आवाहन केले. लावलेल्या सर्व रोपांचे नियमित संगोपन व्हावे यासाठी शाळेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले असून, ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे रोपांना वर्षभर आवश्यक पाणी उपलब्ध होऊन त्यांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शाळेचा परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सहभाग यामुळे हा वृक्षारोपण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ‘एक झाड आईच्या नावाने’ हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक मूल्यांची जपणूक करणारा उपक्रम म्हणून सर्वांच्या पसंतीस उतरला.


