कायमस्वरूपी उपाय न झाल्यास मनसेचा ‘श्राद्ध आंदोलनाचा’ इशारा
दिवा प्रभाग समिती अंतर्गत शिळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत अंत्ययात्रा पार पाडावी लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिळ-देसाई विभाग अध्यक्ष शरद गुणाजी पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर टीका करत या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शरद पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या समस्येबाबत अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही केवळ आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना आणि मृतांच्या नातेवाईकांना अत्यंत वेदनादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास येत्या काही दिवसांत ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रतीकात्मक स्वरूपात प्रशासनाचे श्राद्ध घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वारंवार जलमय होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे.


