केडीएमसी महापौरांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा

कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा आणि तुंबापुरी झालेल्या भागाचा दौरा करीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गटारे, नाले, तुंबल्याने सखल भागात पाणी शिरले. या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी फिल्डवर उतरत शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा पश्चिम, टिटवाळा पूर्व, इंदिरानगर, बल्याणी परिसराच्या स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी नाले, गटारातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच जेसीबीच्या सहाय्याने प्रवाह मोकळा करून पाण्याचा निचारा होईल, याकडे भर दिला.

तसेच नाल्यांच्या काठावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत भराव तातडीने काढून टाकण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना केल्या. तसेच सखल भागात पाणी शिरल्याने त्या परिसरात प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांच्या पथका मार्फत ५०० जेवणाची पाकिटे, तसेच पाणीबॉटल यांचे वाटप करण्यात आले. तसेच डोंबिवली लोधा हेवन गावदेवी चौक येथे झालेल्या अपघाताची पाहणी करून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या कॅन्सर रुग्णालयाच्या बेसमेंटसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शेजारील दोन इमारतींजवळील संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने याठिकाणचा देखील पाहणी दौरा यावेळी करण्यात आला.

ठाणे जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक, युवती व स्वयंसेवी संस्थांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ठाणे: महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक युकयो-२०१२/प्र.क्र.६५/क्रीयुसे-३, दि.१२नोव्हेंबर २०१३ अन्वये राज्यातील युवक-युवती तसेच युवक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार व राज्य युवा पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातील पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पुरस्काराचा उद्देश युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे, राष्ट्रनिर्माण व समाजोपयोगी कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव करणे तसेच इतर युवकांना प्रेरणा देणे हा आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट एक युवक, एक युवती आणि एक संस्था यांची निवड करण्यात येणार असून, युवक व युवती यांना प्रत्येकी रु.१० हजार, संस्थेस रु.५० हजार रोख पारितोषिक, गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक अथवा युवतीचे वय दि.१ एप्रिल २०२५ रोजी १३ वर्षे पूर्ण असावे व दि. ३१ मार्च २०२६ रोजी ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच अर्जदाराचे ठाणे जिल्ह्यात सलग किमान पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. संस्थांच्या बाबतीत संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० अथवा सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणीकृत असून किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.

Scroll to Top