डोंबिवलीतील रुग्णालयात शिवसेना (शिंदे) गटाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणामुळे महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंके यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून प्रचंड संताप व्यक्त होत असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी सांगितले की, डॉक्टर हे समाजासाठी रात्रंदिवस सेवा देणारे योद्धे आहेत. उपचारादरम्यान काही तक्रारी असू शकतात, मात्र त्याचे निराकरण केवळ कायदेशीर मार्गानेच झाले पाहिजे. कायदा हातात घेऊन डॉक्टरांवर हल्ला करणे ही लोकशाहीला न शोभणारी कृती असून महाराष्ट्रात अशी दादागिरी आणि हिटलरशाही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.
त्यांनी पुढे मागणी केली की, डोंबिवलीतील घटनेतील दोषींवर ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम, २०१०’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयांमध्ये प्रभावी यंत्रणा उभारावी. डॉक्टरांना रुग्णसेवा बजावत असताना मारहाण सहन करावी लागणे आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून अशा घटना सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणाऱ्या आहेत.


