पडघा परिसरातील वीज समस्यांवर टोरंट पॉवरसोबत सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने टोरंट पॉवर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रकाश भोईर यांनी यापूर्वी टोरंट पॉवरच्या व्यवस्थापनाकडे सविस्तर निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची दखल घेत पडघा येथील कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत पडघा आणि परिसरातील वारंवार होणारी वीजखंडिती, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा, तक्रारींचे वेळेवर निराकरण न होणे, बिघाडानंतर दुरुस्ती करण्यास होणारा विलंब तसेच ग्राहकांना अधिक तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सामाजिक कार्यकत्यांनी सांगितले की, अनियमित वीज पुरवठ्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, लघुउद्योजक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे दैनंदिन कामकाज ठप्प होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे वीजपुरवठा अधिक स्थिर, अखंड आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, दोषग्रस्त उपकरणांची तातडीने दुरुस्ती, तक्रार निवारणासाठी स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा, तसेच ग्राहकांना जलद प्रतिसाद देणारी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीला शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर यांच्यासह भगवान सांबरे, अजय पाटील, शैलेश बिडवी, रमेश शेलार, संजय पटेल, महेश राऊत, भास्कर पाटील, काशिनाथ शेलार, मुजाहीद नाचण, अशोक बजागे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. टोरंट पॉवरच्या वतीने पडघा विभागाचे उपमहाव्यवस्थापक किरण ऊपरकर, व्यवस्थापक महेंद्र काटे आणि जनसंपर्क अधिकारी अमित कडू यांनी बैठकीत उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या. संबंधित तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात येतील, तसेच ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी कंपनी सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीनंतर पडघा परिसरातील नागरिकांनी या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल, नियमित व अखंड वीजपुरवठा सुरू राहील आणि प्रलंबित तक्रारींचे लवकर निराकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन आणि सेवा पुरवठादार संस्थांनी अधिक संवेदनशील व उत्तरदायी भूमिका घेण्याची गरज असल्याचेही मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Scroll to Top