बाळकुम येथील गौतम नगर, पाडा क्रमांक ३ परिसरात झाड कापण्याच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळकुम परिसरातील गौतम नगर येथील द्वारकानाथ पाटील यांच्या चाळीवर झाड कोसळले होते. हे झाड हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील मजूर आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान संयुक्तपणे कार्यरत होते. यावेळी ठेकेदाराकडील मजूर बालाजी काशिनाथ डोंगरे (४२) रा. वाघबीळ हे चाळीच्या पत्र्यावर चढून झाड कापत असताना अचानक पत्रा तुटला. त्यामुळे ते खाली पडले. त्याचवेळी झाडाचा ओंडका त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित अधिकारी व जवानांनी तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, उपायुक्त मधुकर बोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, कापूरबावडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.


