रसिक वाचक, ठाणेच्या १२५ व्या विशेष सत्राला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रसिक वाचक, ठाणे आयोजित १२५ व्या विशेष सत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ, लेखक आणि विचाखंत डॉ. गिरीश जाखोटिया यांनी ‘कादंबरी लिहिण्यामागचे गुपित’ आणि ‘जागतिक अशांतता आणि भारत’ या दोन विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. हितवर्धनी सभागृहात ११ जुलै रोजी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, वाचक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रसिक वाचक, ठाणेचे प्रमुख ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी, ज्येष्ठ अभ्यासक श्रीकांत वाळिंबे तसेच ज्ञानेश्वर प्रकाशनचे प्रकाशक भूषण मुळ्ये उपस्थित होते. श्रीकांत वाळिंबे यांच्या हस्ते डॉ. जाखोटिया यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात रसिक वाचक, ठाणेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कोविड लॉकडाऊनच्या काळात वाचनसंस्कृती जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज यशस्वीपणे १२५ व्या सत्रापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या उभारणीत सदाशिव कुलकर्णी आणि भूषण मुळ्ये यांचे मोलाचे योगदान असल्याचेही नमूद करण्यात आले.
पहिल्या सत्रात ‘कादंबरी लिहिण्यामागचे गुपित’ या विषयावर बोलताना डॉ. जाखोटिया यांनी उत्कृष्ट साहित्यनिर्मिती साठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती, व्यापक वाचन, जीवनानुभव, कल्पनाशक्ती आणि सामाजिक भान या घटकांचे महत्त्व विशद केले. कादंबरी ही केवळ काल्पनिक कथा नसून समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करणारे आणि माणसाला अंतर्मुख करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य हे मनोरंजनापुरते मर्यादित नसून segor
समाजाला विचार करायला आणि परिवर्तनासाठी प्रेरित करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात ‘जागतिक अशांतता आणि भारत’ या विषयावर बोलताना त्यांनी सध्याच्या जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचे सखोल विश्लेषण केले. युक्रेन-रशिया युद्ध, इजरायल-इराण संघर्ष, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, अमेरिकेचे बदलते जागतिक धोरण आणि इतर भू-राजकीय घडामोडी यांमुळे जग अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, ऊर्जा सुरक्षेवर, कच्च्या तेलाच्या किमतींवर, महागाईवर आणि जागतिक पुरवठा साखळी वर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील गरिबीच्या व्याख्येतील जुटी, दरडोई उत्पन्नाची तुलनेने कमी पातळी आणि चीनच्या झपाट्याने झालेल्या आर्थिक प्रगतीचा संदर्भ देत त्यांनी भारताने आपल्या विकासाचे मापदंड बदलण्याची गरज अधोरेखित केली. ‘आपण पाकिस्तानशी तुलना करण्यात समाधान मानू नये; जर्मनी, चीन आणि इतर विकसित राष्ट्रांना आपले बेंचमार्क मानून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी काही ठोस उपायही सुचविले. सामूहिक आणि सहकारी शेतीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पुरेसे खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, देवस्थानांतील निष्क्रिय सोन्याचे मोनेटायझेशन करून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारणे, मर्यादित कालावधीसाठी अतिश्रीमंत वर्गावर वेल्थ टॅक्सचा विचार करणे आणि शेअरिंग इकॉनॉमीचा व्यापक स्वीकार करणे, या उपाययोजनांचा त्यांनी पुरस्कार केला.
जागतिक शांतता, सक्षम अर्थव्यवस्था, दीर्घकालीन नियोजन आणि सुजाण नागरिकत्व या चार स्तंभांवरच भारताचा भविष्यकालीन विकास अवलंबून असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानात ठामपणे मांडले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मनीषा चव्हाण यांनी केले. उपस्थित साहित्यप्रेमी आणि वाचकांनी डॉ.
जाखोटिया यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. रसिक वाचक, ठाणेच्या प्रत्येक उपक्रमाप्रमाणे या विशेष सत्रालाही उपस्थितांनी प्रेम, दाद आणि उदंड सहकार्य दिले, कार्यक्रमाचा समारोप शुभांगी आजगांवकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.


