मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आणि राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिशय व्यापक स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या विशेष आढावा बैठकीत प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवून शासकीय योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठकीदरम्यान ठाणे जिल्ह्याची शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागांची वैविध्यपूर्ण रचना लक्षात घेऊन थेट नागरिकांच्यादारापर्यंत पोहोचण्याच्या धोरणावर भर दिला.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील गावे व पाड्यांवर संध्याकाळच्या वेळी ‘घोंगडी बैठका’ आयोजित केल्या जाणार असून, या बैठकांमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी आणि रेशन व्यावसायिक प्रत्यक्ष जमिनीवर बसून ग्रामस्थांशी संवाद साधतील. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेत विविध शासकीय योजनांचा ऑन-द-स्पॉट लाभउपलब्ध करून दिला जाणार आहे. या अभियानात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावर वारस हक्काने महिलांची नावे लावणे, घरकुलांमध्ये पती-पत्नीची संयुक्त मालकी नोंदवणे आणि रेशन कार्डवर महिलेस कुटुंबप्रमुख म्हणून नोंदवण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महिला बचत गटांना ‘बँकर्स बैंक ऑन स्पॉट’ उपक्रमाद्वारे तात्काळ कर्ज पुरवठा करणे, डिजिटल साक्षरता स्टॉलद्वारे ई-कॉमर्स नोंदणी सुलभ करणे, तसेच महिलांच्या आरोग्यासाठी मोफत कर्करोग व अॅनिमिया तपासणी शिबिरे आणि मोफत कायदेशीर समुपदेशन केंद्र उभारण्याची सर्वसमावेशक आखणी करण्यात आली आहे.


