ठाण्याच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ गती प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी कालबद्ध नियोजन करा-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, पॉड टॅक्सी, चौकांचे सुशोभीकरण आदी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. “ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडविणारी विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रो प्रकल्पात नागरिकांच्या ठाणे शहरातील मेट्रो अलाइनमेंट आणि रस्ते विकासकामांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंटमुळे परिसरातील संरचनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे तांत्रिक सर्वेक्षण करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. संबंधित भागात प्रत्यक्ष मार्किंग, सर्व यंत्रणांची संयुक्त पाहणी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पारदर्शक पद्धतीने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्ते विकासकामांदरम्यान भूमिगत वीज केबलचे नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. हिरानंदानी परिसरातील प्रलंबित संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. वाघबीळ येथील प्रस्तावित शूटिंग रेंज प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Scroll to Top