आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना अटक
वसई गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत तब्बल २ कोटी ५ लाख ८० हजार रुपये किमतीचे २ किलो ५८ ग्रॅम अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वसईतील जी.जी. कॉलेज परिसरात सापळा रचण्यात आला. अंबरग्रीसच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीसाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपींकडून २ किलो ५८ ग्रॅम अंबरग्रीस, एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २.०५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उदीत सातवसे (३८), कृष्णकांत देसाई (३४), विशाल ठाकरे (२८), अकिल पिव्ही (२८) आणि सुहाद कोया (३२) अशी आहेत. प्राथमिक तपासात हे आरोपी अंबरग्रीस च्या बेकायदेशीर व्यवहारासाठी एकत्र आल्याचे निष्पन्न झाले आहे.
OHIS अंबरग्रीस हा संरक्षित सागरी प्राण्याशी संबंधित अत्यंत दुर्मिळ पदार्थ असून त्याची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे.


