मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
“मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी सिनेमा आपल्या जवळचा सिनेमा आहे, हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. मोठे हॉलिवूड चित्रपट असले तरी मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला,” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेल्या विजू माने दिग्दर्शित ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटातील कलाकार कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण यांनी शनिवारी हिरानंदानी इस्टेट येथील द वॉक मधील देवगण सिनेक्स येथे माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्या आठवड्यातील सुमारे १७० थिएटर्सची संख्या आता २०० हून अधिक झाली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता अनेक चित्रपटगृहांनी शोची संख्याही वाढवली आहे.
अभिनेते आणि चित्रपटातील कलाकारांनी यावेळी मराठी प्रेक्षकांचे आभार मानले. दिग्दर्शक माने यांनी कॉमेडी हा अत्यंत कठीण प्रकार असल्याचे सांगत, प्रेक्षकांनी ‘मामाच्या गोव्याला जाऊया ‘ला दिलेला प्रतिसाद भारावून टाकणारा असल्याचे म्हटले. “मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा आपल्या जवळचा असल्याचे दाखवून दिले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चित्रपटातील कलाकारांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची आठवण करून देत मराठी प्रेक्षकांनी निखळ कॉमेडीला देखील प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
विशेष म्हणजे महिलांनी आणि संपूर्ण कुटुंबांनी चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याचे कलाकारांनी सांगितले. पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील थिएटर भेटींमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. “मामाच्या गोव्याला जाऊया’ हा संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचा पॅकेज आहे,” असे संतोष जुवेकर यांनी सांगितले. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्येच जाण्याचे आवाहन करत कलाकारांनी पायरसीला नकार देण्याचेही आवाहन केले.


