विद्यार्थ्यांच्या मनावर उमलत्या वयातच राष्ट्रभक्तीचे व देशप्रेमाचे संस्कार व्हावेत यादृष्टीने ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये 9 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे महापालिका शिक्षण विभागामार्फत सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून शालेय स्तरावर नानाविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला यावर्षी 150 वर्षे पूर्ण होण्याच्या अनुषंगाने यावर्षीची ‘हर घर तिरंगा’ मोहीम ‘वंदे मातरम्’ या संकल्पनेवर आधारित ठेवण्यात आलेली असून अनेक शाळांमध्ये दररोज ‘वंदे मातरम्’ गीत ध्वनीक्षेपकाव्दारे वाजविले जात आहे. त्याचप्रमाणे काही शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे समुह गायनही आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन कल्पकतेने तयार केलेल्या तिरंगा सेल्फी स्टँडी उपक्रमासही अनेक शाळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
14 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात ‘फाळणी भयावहता स्मृतीदिवस’ म्हणून पाळण्यात येत असून यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 13 ऑगस्टपासून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या फाळणीविषयक माहितीप्रद प्रदर्शनाला नमुंमपा शाळा क्र. 110 प्रमाणेच काही शाळांनी विद्यार्थी भेट घडवून आणून विद्यार्थ्यांच्या माहितीत स्वातंत्र्यविषयक जाणीव जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
काही शाळांमध्ये राष्ट्रध्वजामधील तीन रंगांचे कागद वापरून विविध आकर्षक वस्तू बनविण्यात आल्या व त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले. यामधील विशेष उपक्रम म्हणजे नमुंमपा शाळा क्र. 117 या शाळेतील विद्यार्थिनींनी तिरंगी राख्या तयार करून त्या भारतीय तटरक्षक जवानांच्या हातावर बांधल्या.
रा.फ. नाईक विद्यालय बोनकोडे, गुरू गोविंदसिंह एज्युकेशन अकॅडमी सेक्टर 19 नेरूळ या शाळांनी भव्यतम रॅली काढून राष्ट्रभक्तीचा जागर केला.
पीएमश्री नमुंमपा सीबीएससी शाळा क्र. 94 कोपरखैरणे यांनी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर केले. सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजात असलेल्या तीन रंगांचा कागद वापरून कागदी फेटे तयार केले. बहुतांशी शाळांमध्ये माहितीपटाद्वारे ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत राष्ट्रध्वजाची माहिती तसेच ‘वंदे मातरम्’ गीताची माहिती देण्यात आली. काही शाळेत प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आले.
या उपक्रमांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व परिसरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.


