स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला.
यावेळी बोलताना, ड्रोन, क्षेपणास्त्रे, सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, आधुनिक युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणालीमुळे भारताची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शांतता, सुरक्षा आणि विकास हीच नवी त्रिसूत्री देशातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली शांतता, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीमुळे देशाच्या दुर्गम भागातही विकासाची नवी पहाट उगवली असल्याचे सांगितले. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे सांगत शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले. ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो, ठाणे-बोरिवली बोगदा, धोडबंदर मार्ग, वाहतूक सुधारणा, पुनर्विकास, ओपन स्पेस आणि नागरिकांना विश्वासात घेऊन राबविले जाणारे प्रकल्प ठाण्याचे भवितव्य बदलतील. कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग आता अधिक वाढला असून नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडविणारे आरोग्य, कृषी, शिक्षण, सुरक्षा आणि डिजिटल प्रशासनाचे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


