भिवंडी कल्याण सीमेवरील नागरीकरण झालेल्या कोनगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी परिवर्तन पॅनलचे अनिकेत म्हात्रे यांनी जय चोरोबा संघटना पॅनलच्या रजनी नाईक यांचा अवघ्या एक मताने पराभव करीत विजय संपादन केला आहे. भाजपा समर्थीत परिवर्तन पॅनलचे अनिकेत म्हात्रे यांना ९ तर पराभूत जय चोरोबा संघटना पॅनलच्या रजनी नाईक यांना ८ मते मिळाली असून एक सदस्य अनुपस्थित होते. या विजयासाठी परिवर्तन पॅनलचे प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेता वरुण पाटील व विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
सार्वत्रिक निवडणुकीनंतर दोन्ही पॅनल एकत्र सत्ताधारी म्हणून कारभार करीत होते. परंतु उपसरपंच पदासाठी अनिकेत म्हात्रे यांचे नाव पुढे आल्यानंतर जय चरोबा सामाजिक संस्था पॅनल कडून अचानक रजनी नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका सदस्याने गुप्त मतदान घेण्याची मागणी केल्याने पीठासन अधिकारी सरपंच रेखा सदाशिव पाटील यांनी निवडणूक घेतली. ज्यामध्ये अनिकेत म्हात्रे विजयी झाले.


