स्वातंत्र्यदिनानिमित्त सुनील लकडे यांचा अनोखा उपक्रम

अस्नोली गटातील १८ जि.प. शाळांना साहित्य किटचे वाटप

स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उत्साहात आणि दिमाखात साजरा करता यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल सन्मान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने एस.एल. फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील नारायण लकडे यांच्या वतीने अस्नोली गटातील जिल्हा परिषद शाळांसाठी अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अस्नोली गटातील १८ जिल्हा परिषद शाळांना ध्वजारोहणासाठी राष्ट्रध्वज (तिरंगा), तिरंगा दोरी तसेच विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट किटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

एस.एल. फाऊंडेशनच्या वतीने मनोज लकडे, जयेश फर्डे, अजय फर्डे आणि यश डोंगरे यांनी विविध जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेट देत तिरंगा व साहित्य किटचे वितरण केले. या उपक्रमाचा लाभ साठगाव, शिलोत्तर, सारंगपुरी, शेणवा, कुल्हे, मुसई, मुसईवाडी, खैरे, नारायणगाव, मळेगाव, बेडीसगाव, उभ्रई, परटोली, अस्नोली, मुगाव, गेगाव, नांदवल आणि कुडशेत येथील जिल्हा परिषद शाळांना झाला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच राष्ट्रीय सणांचे महत्त्व समजावे, राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण व्हावा आणि देशभक्तीची भावना त्यांच्या मनात रुजावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

Scroll to Top