नवी मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माइंडस्पेस आरईआयटी यांच्या सहयोगाने ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा आणि ई – कचरा पुनर्वापर उपक्रमाच्या अनुषंगाने प्लास्टिक पुनर्प्रक्रियेतून तयार केलेल्या १०० कचराकुंड्या आणि ६५ गार्डन बेंचेसचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण नमुंमपा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या संयुक्त सहभागातून नवी मुंबईत प्लास्टिक संकलन, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेसोबतच नागरिकांमध्येही पर्यावरणाविषयी जनजागृती केली जात आहे व नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमधून मागील ११ महिन्यात आत्तापर्यंत साधारणतः ९ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले असून त्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. वेगवेगळ्या स्वरूपातील जनजागृतीच्या माध्यमातून सुमारे ५५ हजार विद्यार्थी व नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात यश आले आहे.
या उपक्रमात आत्तापर्यंत ५३ शाळा, ९ महाविद्यालये, २० गृहनिर्माण सोसायट्या आणि १० कार्यालये सक्रिय सहभागी झाली आहेत. प्लास्टिक संकलनात सातत्याने योगदान देणाऱ्या सहभागी संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई आणि माईंडस्पेस आरईआयटी यांच्या माध्यमातून संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून पुनर्प्रक्रियाकृत प्लास्टिकपासून तयार केलेल्या कचराकुंड्या व गार्डन बेंचेस या संस्थाना देण्यात येत आहेत.


