कर्जत तालुक्यात खड्यांचे साम्राज्य

कर्जत तालुक्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत दुरवस्था आणि प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम व पोलीस मित्र संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांची पाहणी करून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरत प्रसारमाध्यमांसमोर खड्डेमय रस्त्यांची पोलखोल केली.

येत्या गणेशोत्सवापूर्वी जर हे सर्व खड्डे भरले नाहीत, तर गणपती बाप्पाची मूर्ती मांडीवर घेऊन रस्त्यातील खड्यातच उपोषणाला बसण्याचा आणि रस्ते खड्डामुक्त होईपर्यंत बाप्पाचे विसर्जन न करण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील मुख्य व ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मांडवणे – हेदवली रोड, कडाव तलावाकडून जाणारा टाटा रोडला जोडणारा रस्ता, कर्जत – मुरबाड रोडवरील वंजारवाडी येथील खड्डे, सावळा फाटा ते सावळे – हेदवली रोड, हेदवली येथील मुख्य रस्ता, कडाव – वैजनाथ मार्ग मांडवणे रस्ता तसेच आंबोट – गौळवाडी रस्ता अशा अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत.

Scroll to Top