भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसुली करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या
कर्मचाऱ्यांनी रविवारी सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना जपत पडघा येथील मातोश्री
वृद्धाश्रमां मधील ज्येष्ठ नागरिकां सोबत रक्षाबंधन हा स्नेहाचा सण उत्साहात साजरा करीत वृद्ध
मातापित्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. या सोबत टोरंट पॉवर कंपनीने
आनगाव येथील वनप्रस्थ वृद्धाश्रम आणि ठाणे येथील उपवन वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील
वृद्धांसोबत हा सण उत्साहात साजरा केला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
साधत जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना मिठाईचे वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित केला आहे.
यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत नाचून आपला आनंद साजरा केला
आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते पारंपरिक रक्षाबंधन सोहळा. महिला कर्मचाऱ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ पुरुषांच्या मनगटावर राखी बांधली, तर ज्येष्ठ महिलांनी पुरुष कर्मचाऱ्यांना राखी बांधून परस्पर सन्मान, जिव्हाळा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेले नाते दृढ केले. या भावनिक क्षणांनी वातावरण भारावून गेले. ज्येष्ठ नागरिकांनी टोरेंट पॉवरच्या कर्मचाऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. टोरेंट पॉवर फक्त व्यवसाय मर्यादितआमची जबाबदारी मानत नाही. सण उत्सव हे – समाजातील प्रत्येक घटकाला आनंद देण्याचे माध्यम असतात. या सोहळ्यात आमच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेत या ज्येष्ठ नागरिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपुलकी, प्रेम आणि कुटुंबाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया टोरंट पॉवर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदानिया यांनी दिली आहे.


