विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दंडाऐवजी राखी बांधुन मोफत हेल्मेटचे वाटप
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार, ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तीनहात नाका जंक्शन येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमांचे महत्त्व समजावत वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांच्या हातावर राखी बांधत, ‘आपली सुरक्षितता हीच कुटुंबासाठी खरी भेट’ असा भावनिक संदेश दिला.
विशेषतः विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या काही वाहन चालकांना थांबवून त्यांना हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना चक्क मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाला वाहनचालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त अंजली भोईर, ठाणे नगर वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, नौपाडा वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्यासह वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे एकीकडे वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती झाली, तर दुसरीकडे हेल्मेट वापराचे महत्त्वही वाहनचालकांच्या मनावर ठसविण्यात आले. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांचा हा उपक्रम ‘राखीच्या धाग्यातून सुरक्षिततेचा संदेश’ देणारा ठरला आहे.


