जागतिक कीर्तीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा दिन नवी मुंबईमध्ये घणसोली शाळेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके, मैदानी खेळ, शारीरिक तंदुरुस्तीचे उपक्रम तसेच मल्लखांबाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना नियमित व्यायाम व खेळाचे महत्त्व समजावे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश त्यांच्या मनात खोलवर रूजावा या उद्देशाने आयोजित हा विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागाने यशस्वी झाला. याप्रसंगी नगरसेवक तथा क्रीडा समिती सदस्य निशांत भगत, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटके, नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, राज्य क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर, मुख्याध्यापिका अर्चना म्हात्रे तसेच क्रीडा शिक्षक संतोष मुंढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी क्रीडा समिती सदस्य नगरसेवक निशांत भगत यांनी नवी मुंबईतील खेळाडूंच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.
खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडा मैदाने, प्रशिक्षण सुविधा, क्रीडा साहित्य तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. नवी मुंबईतील खेळाडूंना चांगल्या सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आणखी चांगल्या प्रकारे राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करीत अत्यंत उत्साहाने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. JUST OR WIDSH


