१ ऑक्टोबर पासून एसटीचे एनसीएमसी कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबर पासून एसटीचे एनसीएमसी कार्ड अनिवार्य

ठाणे – एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभघेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे.
त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रवाशांकडे कार्यरत Active NCMC कार्ड आहे किंवा NCMC कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. NCMC कार्डची नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ETM मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे. NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक, आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर NCMC कार्ड नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM Appद्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून कार्डमध्ये रक्कम भरता येणार आहे. आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणी करताना अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Scroll to Top