आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध योजनांच्या माहितीपर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून शहापूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिवासी बांधवांना योजनांची माहिती देऊन शाळा व वसतिगृहांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. १७सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान अंतर्गत आदिवासी विकास विभागा मार्फत विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. या अनुषंगाने शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वतीने आयोजित या विविध उपक्रम प्रचार रथाचे उद्घाटन शहापूर आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर, या अनुषंगाने शहापूर प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहा प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव, दिवाकर काळपांडे, बी. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प कार्यालय अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, वस्तीगृह गृहपाल यांच्या देखरेखीखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रचार प्रसिध्दी रथा बरोबरच काही शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे येथे वृक्षारोपण, निबंध – चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर व व्यसनमुक्ती आदी उपक्रम हाती घेऊन पार पडत आहेत. तसेच या सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत असून प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आदिवासी बांधवांशी संवाद साधून आदिवासी विकास विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव यांनी म्हटले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम



