देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांना घडविण्याचे काम शिक्षक प्रामाणिक पणे करीत असल्यानेच उद्याचे देशाचे भवितव्य सुरक्षित आहे असे उदगार खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केले. ते भिवंडी पंचायत समिती वतीने आयोजित जिल्हा परिषद आदर्श शिक्षक गौरव सोहळ्यात बोलत होते.
या प्रसंगी पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी गोविंद घोरपडे, माजी पंचायत समिती सभापती विकास भोईर, पदाधिकारी बाळाराम कराळे, शरद पाटील, कृष्णा वाकडे यांसह अनेक मान्यवर व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलं म्हणून मी आज एवढा सक्षम होऊ शकलो. इंग्रजी शाळेचे महत्व वाढले आहे. पण आज ही ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेचे महत्व मोठे आहे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांना धाक असणे गरजेचे आहे. देशाचे भविष्य आपण घडवता म्हणून आपण सर्वच शिक्षकांसमोर नतमस्तक होत असून, मी शिक्षकांचा सन्मान करायला मिळाल्या मुळे स्वतःला भाग्यवान समजतो अशी भावना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्यात प्रीती मिलिंद भोईर -वडूनवघर, देवयानी बाळाराम पाटील – शेलार, मनीषा गोविंद पवार – कुहे, रेश्मा वीरेंद्र आर्यमाने -दापोडे, सुवर्णा सुरेश ठाकरे -माडोशी, गीता सिताराम चासकर कोशिंबी, शर्मिला बाळाराम पाटील – अकलोली, नंदू सिताराम नाईक – वडपे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केला आहे.
मुलांना घडवण्याचे काम शिक्षक प्रामाणिक पणे करतात : खासदार बाळ्या मामा



