भिवंडीत लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त

भिवंडीत लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त

शहरातील दर्गाह नाका परिसरातील समरु बाग येथील एका इमारतीत अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत दोन फ्लॅटमध्ये साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा बुधवारी जप्त केला. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष सिरोसिया यांनी दिली.
समरु बाग येथील एका इमारतीमधील दोन फ्लॅटमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने संबंधित फ्लॅटवर कारवाई केली. दोन्ही फ्लॅट बंद असल्याने पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचे कुलूप तोडून पथकाने आत प्रवेश केला. यावेळी फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
सदर ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही फ्लॅटचे कुलूप तोडून तपासणी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष सिरोसिया यांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Scroll to Top