मिरा भाईंदर महापालिकेच्या वतीने ‘प्लॉग रन’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मिरा भाईंदर महापालिकेच्या वतीने 'प्लॉग रन' स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मिरा भाईंदर महापालिकेच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘प्लॉग रन’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, बचत गट, स्थानिक संस्था तसेच विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचवावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्लॉग रनच्या माध्यमातून धावताना किंवा चालताना मार्गातील प्लास्टिक, कचरा रस्त्यावर न टाकण्याबाबत जनजागृती करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. प्लॉग रनसाठी शहरातील विविध ठिकाणांहून स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले असून सर्व मार्गाचा समारोप गोल्डन नेस्ट सर्कल, भाईंदर (पूर्व) येथे होणार आहे. मॅक्सस मॉल ते गोल्डन नेस्ट सर्कल, नगरभवन ते मॅक्सस मॉल ते गोल्डन नेस्ट सर्कल, नवघर नाका हनुमान मंदिर ते विमल डेअरी ते गोल्डन नेस्ट सर्कल, मा. आयुक्त निवास ते सिनेमॅक्स ते गोल्डन नेस्ट सर्कल, मिरा रोड रेल्वे स्टेशन ते गोल्डन नेस्ट सर्कल तसेच एस. के. स्टोन मैदान ते गोल्डन नेस्ट सर्कल अशा विविध मार्गावरून सकाळी ८ ते १० या वेळेत प्लॉग रन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी नागरिकांनी संकलित केलेला कचरा योग्य पद्धतीने जमा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. संकलित कचऱ्याची पुढील प्रक्रिया करण्यासाठी तो महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेमार्फत पाठविण्यात येणार आहे. प्लॉग रनच्या माध्यमातून स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक सहभागाची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. महापौर डिंपल विनोद मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील आणि
महापालिका मा. आयुक्त राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, मिरा भाईंदर शहरातील विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सामाजिक संस्था व विविध घटकांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित प्लॉग रनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top