पुष्पहार नव्हे, कृतीतून अभिवादन; काँग्रेसचा स्वच्छतेचा निर्धार

काँग्रेसचा स्वच्छतेचा निर्धार

महात्मा गांधींच्या विचारांना केवळ अभिवादन न करता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा संदेश देत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी जयंती विविध सामाजिक आणि रचनात्मक उपक्रमांनी साजरी केली. ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमांत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील विशेष स्वच्छता अभियानाने विशेष लक्ष वेधून घेतले.
तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या विचारांना अभिवादन केले. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम’ या गांधीजींच्या आवडत्या भजनाचे सामूहिक गायन करण्यात आले.
गांधी जयंतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात काँग्रेस आणि ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामूहिक शपथ घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत परिसराची स्वच्छता केली. सकाळी ८.३० ते १० या वेळेत झालेल्या या अभियानामुळे स्थानक परिसरात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. ज्येष्ठ नेते व माजी खासदार कुमार केतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक १० च्या वतीने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘गांधीजींचे विचार’ आणि ‘स्वच्छ भारत’ या विषयांवर मुलांनी चित्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, ब्लॉक अध्यक्ष, सेल अध्यक्ष, महिला काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेस सह काँग्रेसचे सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपक्रमांत सहभागी झाले. सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि जनजागृतीचा संदेश देत ठाणे काँग्रेसने गांधी जयंतीला विधायक उपक्रमांची जोड दिली.

Scroll to Top