17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासनाने सूचित केलेल्या विविध उपक्रमांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी सुरू असून यामधील ‘सेवा योगदान’ या उपक्रमांतर्गत ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षितता व डिजिटल साक्षरता’ हा अभिनव उपक्रम ज्येष्ठांच्या उत्साही गर्दीत राबविण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष कार्यक्रमात ‘ज्येष्ठ नागरिकांची सायबर सुरक्षितता व डिजिटल साक्षरता’ या विषयावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देत ज्येष्ठ नागरिकांनी हाऊसफुल्ल भरलेल्या प्रेक्षागृहात दिलखुलास संवाद साधत डिजिटल माध्यमांविषयी जनजागृती केली. त्यांच्यासमवेत अंमलदार अमोल कर्डिले उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक अनेकदा सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य बनतात असे सांगत काळाची पावले ओळखून आता मुला-नातवंडाच्या मदतीने ज्येष्ठांनी स्वतःहूनच डिजिटल साक्षर होण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याकरिता स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटर वापरण्याची सर्वसाधारण माहिती असणे तसेच सुरक्षित आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने ऑनलाईन बँकिंग, यूपीआय (UPI) आणि ई-वॉलेट (Google Pay, PhonePe) चा वापर सुरक्षितपणे कसा करावा याचीही माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या माध्यमांवर कोणती माहिती शेअर करावी आणि कोणती टाळावी, इंटरनेटवर किंवा व्हॉट्सअॅपवर येणारे सर्वच संदेश खरे नसतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी घडलेली अनेक उदाहरणे सांगत पटवून दिले.
यादृष्टीने सायबर सुरक्षितता बाळगण्याची आवश्यकता असून आपले बँक खाते, ईमेल आणि सोशल मीडियासाठी समजण्यास कठीण (Strong) असा पासवर्ड ठेवणे आणि तो कोणासोबतही शेअर न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बँकेचे अधिकारी किंवा इतर कोणीही फोनवर ओटीपी (OTP), यूपीआय पिन (UPI PIN) किंवा एटीएम कार्डचा नंबर मागितल्यास तो कधीही देऊ नये अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. याशिवाय “तुम्हाला लॉटरी लागली आहे” किंवा “तुमचे वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन कट होईल” अशा प्रकारच्या खोट्या मेसेजमधील अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे टाळावे त्याचप्रमाणे केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली येणाऱ्या फसव्या फोन कॉल्सना बळी पडू नये हे त्यांनी आवर्जून सांगितले. बँक कधीही फोनवर वैयक्तिक माहिती मागत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये स्क्रीन शेअरिंग अॅप्स (AnyDesk, TeamViewer) अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून डाऊनलोड करू नयेत, यामुळे मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो अशी धोक्याची सूचना देत घरातील तरुण सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान शिकवण्यासाठी वेळ देणेही तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रोजच्या जीवनातील पूरक उदाहरणे सांगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन कदम यांनी साधलेल्या दिलखुलास संवादामुळे सायबर सुरक्षितता या बाबीचे गांभीर्य अधिक प्रकर्षाने लक्षात आले असे अभिप्राय उपस्थित ज्येष्ठ नागरिकांकडून मिळाले.
सेवा संकल्प अभियानातील इतरही उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
‘ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षितता व डिजिटल साक्षरता’ उपक्रमातून नवी मुंबईत जागरूकता



