ठाणे महापालिकेतर्फे जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत बुधवारी (०७ ऑक्टोबर) ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त विविध जनजागृतीपर आणि उपक्रमशील कार्यक्रम महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त-1 प्रशांत रोडे, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त डॉ. मिताली संचेती, समाज विकास अधिकारी दयानंद गुंडप, तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिभ्रंशाबाबत मार्गदर्शन केले. स्मृतिभ्रंशाची प्राथमिक लक्षणे, त्याची कारणे, वयोमानानुसार मानसिक आणि शारीरिक घटकांमध्ये होणारे बदल आणि या आजारात रुग्ण व कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
या प्रसंगी स्मृतिभ्रंश विषयावर आधारित ‘स्मृती’ या लघुपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. स्मृतिभ्रंशामुळे बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या भावनिक व सामाजिक संघर्षाचे प्रभावी चित्रण या लघुपटातून करण्यात आले. हा लघुपट पाहताना सभागृहातील अनेक ज्येष्ठ नागरिक भावूक झाले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अॅड. प्रमोद ढोके यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरतेवर विशेष व्याख्यान दिले. दैनंदिन जीवनात स्मार्टफोन व इतर डिजिटल साधनांचा सुरक्षित, सोपा आणि आत्मनिर्भर पद्धतीने वापर कसा करावा, याविषयी उपस्थितांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या स्मरणशक्तीला चालना मिळण्यासाठी व त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी स्मरणशक्तीवर आधारित मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांनी या खेळात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. स्पर्धांमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याची जाणीव, डिजिटल साक्षरता आणि सामाजिक सहभाग वाढविण्याचा मोलाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Scroll to Top