दशावतारामागील मानवी उत्क्रांतीचा प्रवास समजनू घेणे ही काळाची गरज – राजेंद्र पाटणकर

दशावतारामागील मानवी उत्क्रांतीचा प्रवास समजनू घेणे ही काळाची गरज

भारतीय संस्कृतीतील दशावतार आणि मानवी उत्क्रांती यांचा परस्परसंबंध उलगडून सांगत ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र पाटणकर यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. दशावताराकडे केवळ धार्मिक किंवा पौराणिक कथांच्या चौकटीतून न पाहता, त्यामागील जीवनदृष्टी, मानवी स्वभाव आणि उत्क्रांतीचा प्रवास समजून घेणे काळाची गरज असल्याचे पाटणकर यांनी स्पष्ट केले ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व मराठी भाषा सप्ताहानिमित्त महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘दशावतार आणि उत्क्रांती’ या विषयावर ज्येष्ठ निवेदक व विचारप्रवर्तक राजेंद्र पाटणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दशावताराकडे केवळ धार्मिक किंवा पौराणिक कथांच्या चौकटीतून न पाहता, त्यामागील जीवनदृष्टी, मानवी स्वभाव आणि उत्क्रांतीचा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे. दशावतारातील क्रम हा जलचरांपासून अधिक जटिल जीवसृष्टीकडे आणि मानवाकडे होणाऱ्या उत्क्रांतीचे प्रतीक म्हणून मांडला जातो, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
‘उत्क्रांती’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना मानवी शरीरातील पेशींमध्ये सातत्याने होणारे बदल, जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीरात घडणारे परिवर्तन आणि निसर्गाशी असलेले मानवी शरीराचे नाते त्यांनी सोप्या उदाहरणांतून मांडले. मानवी उत्क्रांती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून परिस्थिती व गरजेनुसार जीवसृष्टीत बदल घडत असतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मुक्तपणे प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आल्यामुळे या व्याख्यानाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले. दशावतार, मानवी जीवन आणि उत्क्रांती यांचा एका नव्या दृष्टिकोनातून घेतलेला हा वेध उपस्थितांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक ठरला. यावेळी प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी त्यांचे आभार मानले.

Scroll to Top