साडेचार लाखांचा शासकीय निधी तरीही समतानगरची ई-लायब्ररी धूळखात पडून

साडेचार लाखांचा शासकीय निधी तरीही समतानगरची ई-लायब्ररी धूळखात पडून

जबाबदार कोण? समतानगरमधील नागरिकांची नाराजी

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील समतानगर बौद्ध वस्तीत विद्यार्थ्यांना वाचन, अभ्यास आणि डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सन २०२४ मध्ये शासनाकडून ई-लायब्ररीसाठी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही ई-लायब्ररी गेल्या दोन वर्षांपासून बंद असून, तिच्या प्रवेशद्वाराला कुलूप असल्याचे चित्र असून ई-लायब्ररी धूळखात पडून आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, पुस्तके, फर्निचर, टीव्ही खरेदीसाठी ३ लाख रुपये खर्च केल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या सामान्य रोकडवहीत आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केलेले साहित्य सध्या ई-लायब्ररीत उपलब्ध आहे का, तसेच मंजूर निधीतील उर्वरित रकमेचा विनियोग कसा करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः १ लाख १२ हजार ६३२ रुपयांच्या रकमेची बिले उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन १९९६ मध्ये समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून समतानगर येथे समाजमंदिर बांधण्यात आले होते. कालांतराने या समाजमंदिरात युवकांसाठी व्यायामशाळा सुरू करण्यात आली होती. याच ठिकाणी ई-लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय नेमका कधी घेण्यात आला. याबाबत समतानगर येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ई-लायब्ररी कधी मंजूर करण्यात आली? आणि त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. ई-लायब्ररी उभारण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करणे आणि आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, ही सुविधा बंद असल्याने विद्यार्थ्यांना तिचा लाभ घेता येत नाही. ई-लायब्ररीची देखभाल कोणाकडे आहे, तेथील पुस्तके, फर्निचर आणि टीव्ही संचाची सद्यस्थिती काय आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित खर्चाची मूळ कागदपत्रे, खरेदी आदेश, देयकांच्या नोंदी आणि प्रत्यक्ष साहित्याची तपासणी केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने संपूर्ण आर्थिक व्यवहाराची निष्पक्ष पडताळणी करणे गरजेचे आहे. समतानगरमधील ई-लायब्ररी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने तेथील शैक्षणिक साहित्याची तपासणी करून ई-लायब्ररी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पत्रकार मिलिंद जाधव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. आता संबंधित प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलणार का ? याकडे समतानगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top